कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
death of four year old gunguna in stray dog attack
होशियारपूर (पंजाब) : पंजाबमधील होशियारपूर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. टांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओहरपूर-बस्सी जलाल लिंक रस्त्यावर रविवारी सायंकाळी ही घटना घडली. गुनगुन असे मृत मुलीचे नाव असून, ती उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील ध्यानपूर गावातील रहिवासी रामजीवन आणि प्रीती यांची मुलगी होती. हे दाम्पत्य शेतमजुरीच्या कामासाठी बस्सी जलाल गावात आले होते. दोघे शेतात काम करत असताना मुलीला शेतापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील झाडाखाली बसवले होते. यावेळी सात भटक्या कुत्र्यांनी गुनगुनवर हल्ला केला.

मुख्य आरोपीस अटक
कोलकाता : बारुईपूरमध्ये (दक्षिण २४ परगणा ) झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यामुळे आत्तापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तीन झाली आहे. बारुईपूरमधील रहिवासी असलेली ११ वर्षीय मुलगी शनिवारी बेपत्ता झाली होती. सूर्यपूर हाट परिसरात रविवारी तिचा मृतदेह पोत्यात भरलेला आढळला. यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करीत बारुईपूर-जॉयनगर मार्ग रोखला, टायर जाळले आणि काही पोलिस वाहनांचे नुकसान केले.

‘यूएपीए’अंतर्गत गुन्हा

इडुक्की (केरळ) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितेच्या मुलीचा समावेश असलेल्या व्हिडीओवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सौदी अरेबियाहून परतलेल्या केरळमधील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ४ जुलैला कारीपूर विमानतळावर उतरल्यानंतर मल्लपुरम जिल्ह्यातील ऐक्करपडी येथील रहिवासी मोहम्मद सनूफ (२६) याला ताब्यात घेण्यात आले होते.