हाफीज सईदवर दोषारोप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
हाफीज सईदवर दोषारोप
मूळ आरोपपत्रांच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात एनआयएने वैज्ञानिक पद्धतीने कसून केलेला तपास आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे संकलित करण्यात आलेले पुरावे यांच्या आधारे पाकिस्तानने हल्ल्यासाठी रचलेला कट आणि त्यात सईदचा सक्रिय सहभाग यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी सादर केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात राष्ट्रीय तपास संस्थेने ( एनआयए ) लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद याच्यावर आरोप ठेवले आहेत.
एनआयएने सोमवारी विशेष न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र सादर केले. त्यात सईदवर भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि यूएपीए या कायद्यांतर्गत वैयक्तिक तसेच त्याची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि द रेझिस्टन्स फोर्स (टीआरएफ) यांच्यावर आरोप दाखल केले आहेत. भारताविरोधात युद्ध पुकारणे आणि सीमेपलीकडून कटकारस्थाने रचणे, हे दोन आरोप सईदवर ठेवण्यात आले आहेत. याआधी गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या १ हजार ५९७ पानी आरोपपत्रात एनआयएने साजिद जट्ट या पाकिस्तानी हँडलरसह तीन मृत दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल केले होते. ‘ऑपरेशन महादेव’ मध्ये तीनही दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलांनी राबविलेल्या या विशेष मोहिमेंतर्गत दोन जणांना अटक करण्यात आली असून आरोपपत्रात त्यांच्याही नावाचा समावेश आहे. पहलगाम हल्ल्यासाठी नियोजन करणे तसेच हल्ल्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, हे दोन आरोप लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ जण ठार झाले होते. या प्रकरणी पहलगाम येथील स्थानिक पोलिस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या पाकिस्तानच्या सक्रिय सहभागाचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयए सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून पहलगाम हल्ल्याचा तपास सुरू असल्याचे एनआयएतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.