आनंद टिकवणे अवघड!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आनंद टिकवणे अवघड!
रीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले की आनंद होतो. त्यानंतर हवी तशी नोकरी मिळाली की तोच आनंद द्विगुणित होतो. चांगला पाऊस झाला की शेतकऱ्यांना समाधान मिळते. मुला-मुलींची लग्ने झाली की आई-वडिलांचे मन प्रसन्न होते. घर घेतले, गाडी घेतली, परदेशी पर्यटन केले, एखादे सन्मानपत्र किंवा गौरवचिन्ह मिळाले... अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला सुखाची अनुभूती मिळते. घरी बाळाच्या रूपाने नवीन पाहुणा आला की सर्वांनाच आनंद होतो. घर आनंदाने भरून जाते. घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम असेल, तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहते.

पण मिळालेला हा आनंद टिकायला हवा. मग त्यासाठी काय करावे लागेल? आनंद टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, पर्यटनातून मिळालेला आनंदाचा ठेवा टिकवायचा असेल, तर फिरताना सुरक्षित प्रवास करणे गरजेचे असते. बहुतेकदा आपण आपल्या आनंदाची तुलना इतरांच्या आनंदाशी करतो, किंवा खूप मोठ्या अपेक्षा ठेवतो. अपेक्षाभंग झाला की आनंद मावळतो. त्यामुळे, अपेक्षांचे ओझे कमी करून जे आहे त्यात समाधान मानणे हा आनंद टिकवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. आपल्याकडे जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहिल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. दररोज रात्री झोपताना आजच्या दिवसात कोणत्या तीन गोष्टींमुळे आपल्याला आनंद आणि समाधान मिळाले, याची आठवण काढल्यास मनात आनंदाची कायमस्वरूपी साठवण होऊ लागते.
आनंदावर विरजण पडण्याचे मुख्य कारण म्हणजे भूतकाळातील आठवणी किंवा भविष्याची चिंता. आनंद हा वर्तमानात असतो; तो भूतकाळात शोधू नये किंवा भविष्यासाठी पुढे ढकलू नये.

पूर्वी गावाकडे एक म्हण प्रचलित होती - ‘लग्न झाल्यानंतर लग्न सायवळ आणि नवीन घर बांधल्यानंतर घर सायवळ जायला पाहिजे.’ या म्हणीत जीवनाचे एक मोठे तत्त्वज्ञान दडलेले आहे. लग्न झाले किंवा नवीन घर उभे राहिले म्हणजे आनंद मिळतो; नातेसंबंध आणि घरातील सुख दीर्घकाळ टिकले, तरच त्या आनंदाला खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच आनंद मिळवण्याइतकेच तो जपणे, वाढवणे आणि टिकवणे अधिक महत्त्वाचे असते.

आनंद फक्त मोठ्या उपलब्धीतच असतो असे नाही. सकाळी मिळणारा गरमागरम चहाचा कप, पावसाचा एखादा थेंब, मित्राशी झालेली गप्पांची मैफल, विमानतळावर तसेच रेल्वे स्टेशनवर जुन्या मित्राची अनपेक्षित गळाभेट किंवा कुटुंबासोबत घालवलेला निवांत क्षण - अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता त्यांचा मनापासून आस्वाद घेणे म्हणजे आनंद वाढवणे.

वयोवृद्धांना तसेच बालकांना आपल्या कुटुंबासोबत फिरायला, आवडत्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करायला, पर्यटनाला जायला आणि विविध समारंभांना उपस्थित राहायला अगदी मनापासून आवडते. मात्र, आनंदाची खरी पूर्तता सुरक्षितपणे घरी परतल्यावरच होते. पर्यटनादरम्यान आबालवृद्धांच्या प्रवासाची काळजी घेणे, त्यांना आवश्यक तो आधार देणे आणि योग्य ती खबरदारी घेणे हीदेखील आनंद टिकवण्याची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पावसाळ्यात अनेक तरुण-तरुणींना पांढऱ्या शुभ्र धबधब्यांमध्ये भिजण्याचा मोह होतो; परंतु सुरक्षितपणे घरी परतण्यातच वर्षासहलीचा खरा आनंद सामावलेला असतो.

मी काम करतो त्या बांधकाम क्षेत्रात एखादी इमारत किंवा संरचना गुणवत्ता नियंत्रणाच्या निकषांनुसार उभारणे तुलनेने सोपे असते; पण तीच गुणवत्ता अनेक प्रकल्पांमध्ये सातत्याने टिकवून ठेवणे ही खरी कसोटी असते. आनंदाचेही अगदी तसेच आहे.

आनंद टिकवून ठेवून जगण्यासाठी लागणारी जागरूकता, संयम आणि विवेक जोपासणे हीच खरी कसरत आहे. आनंद हा नशिबाने मिळत नाही. आनंद मिळवावा लागतो आणि तो टिकवणे ही आयुष्यभराची साधना असते.- महादेव पंडित, मुंबई

आनंद टिकवणे अवघड!



आनंद टिकवणे अवघड!