सुरेश भट सभागृहात नवी दालने

महाराष्ट्र टाइम्स
सुरेश भट सभागृहात नवी दालने
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांच्या आणि पाहुण्यांच्या सुविधेसाठी या कन्व्हेन्शन सेंटरला जोडूनच ४ हजार ५०० चौरस फुटांचे एक फाइन डायनिंग रेस्टॉरंट लवकरच सुरू होत आहे. येथे चहा, नाश्त्यापासून ते संपूर्ण भोजनाची उत्तम सोय असणार आहे.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या तळमजल्यावर सर्व सुविधांनी युक्त असे अत्याधुनिक कन्व्हेन्शन, एक्झिबिशन आणि आर्ट गॅलरी लवकरच नागपूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. हे केंद्र कॉर्पोरेट इव्हेंट्स, प्रदर्शने आणि कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.
सुमारे १२ हजार ५०० चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले हे केंद्र सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कॉर्पोरेट, तसेच औद्योगिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या केंद्राची वैशिष्ट्ये आणि रचना आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. या केंद्रामध्ये चार पूर्णपणे वातानुकूलित हॉल्स असणार आहेत. यासाठी फोल्डिंग पार्टीशन सिस्टम वापरण्यात आली आहे. ज्यामुळे गरज पडल्यास हे चारही हॉल एकत्र करून ८ हजार चौरस फुटांचा एक भव्य हॉल तयार करता येऊ शकतो.

कॉन्फरन्स, सेमिनार, वर्कशॉप, बिझनेस मीटिंग्ज आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ही रचना अत्यंत सोयीची असणार आहे. आरामदायी अनुभवासाठी सेंट्रलाइज्ड एअर-कंडिशन्ड हॉल्स, दर्जेदार ध्वनी व्यवस्थेसाठी प्रीमियम अकौस्टिक पॅनल्स, भव्य कार्पेट फ्लोरिंग आणि आधुनिक डेकोरेटिव्ह लाइट्स, बाहेरील आवारात भव्य प्रदर्शन, फूड फेस्टिव्हल किंवा सांस्कृतिक महोत्सवांसाठी तात्पुरते डोम उभे करण्याची सोय ही या केंद्राची वैशिष्ट्ये राहणार आहे. स्थानिक तसेच देशभरातील कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या कलाकृतींची विक्री करण्यासाठी येथे एक आर्ट गॅलरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.