पाच वर्षांत आयआयएम जागतिक स्तरावर

Contributed byम.टा.प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पाच वर्षांत आयआयएम जागतिक स्तरावर
नागपूर आयआयएमला पुणे येथे ७० एकर जागा प्राप्त झाली आहे. ही विस्ताराची केवळ सुरुवात असून येत्या पाच वर्षांत आम्ही जागतिक स्तरावर झेप घेऊ, असा दावा नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी केला आहे.

डॉ. मेत्री यांची नुकतीच आयआयएम नागपूर च्या संचालक पदावर पुढील पाच वर्षांसाठी पुनर्नियुक्ती झाली आहे. सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. मेत्री यांनी भविष्यातील वाटचालीबाबत माहिती दिली. ‘आपल्या दुसऱ्या कार्यकाळात आयआयएम नागपूरला जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० बिझनेस स्कूलमध्ये आणायचे आहे. ‘फ्रॉम इंडिया टू द वर्ल्ड’ या धोरणासह आमची वाटचाल पुढील पाच वर्षे सुरू राहील. पुणे येथे आयआयएम नागपूरचा भव्य परिसर पुढील पाच वर्षांत उभा होईल. यासाठी राज्य शासनाने ७० एकर जागा केवळ एक रुपया या नाममात्र दराने लीजवर दिली आहे. इतका मोठा सेकंड कॅम्पस असलेले आयआयएम नागपूर हे देशातील एकमेव संस्थान असेल. पुण्याबरोबरच गोव्यात विस्ताराची योजना असून, परदेशी विद्यापीठांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. वीस प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांशी करार करून आयआयएमच्या विद्यार्थ्यांना थेट या विद्यापीठाची पदवी मिळवता येईल अशी योजना या पाच वर्षांत अमलात येईल,’ असे त्यांनी सांगितले.
आयआयएम नागपूरने ‘स्ट्रॅटेजिक रोडमॅप २०२६-३१’ तयार केला आहे. अनेक कॅम्पसची उभारणी विस्तार, एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमध्ये देशातील अव्वल तीन संस्थांत स्थान, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यवस्थापन शिक्षण, भारतकेंद्री संशोधन, ऊर्जा व हवामान नेतृत्व, उद्योजकता आणि महाराष्ट्र-विदर्भाच्या विकासात व्यापक योगदान अशी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.