Mumbais Asiatic Society Election Why Did Intellectuals Fail
उद्याच्या ‘एशियाटिक’साठी...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
श्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांखालोखाल गेल्या काही दिवसांत गाजलेली निवडणूक म्हणून मुंबईतील ‘ एशियाटिक सोसायटी ’च्या निवडणुकीचा उल्लेख करायला हवा! या दोन्हींतील मोठा फरक म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ९० टक्क्यांच्या वर मतदान झाले आणि ‘एशियाटिक’च्या निवडणुकीत साधारण २० टक्क्यांच्या आसपास. बुद्धिजीवी वर्तुळातील अत्यंत प्रतिष्ठित अशा या संस्थेच्या मतदारांपैकी ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही, हे दुर्लक्षण. आणि बंगाल व ‘एशियाटिक’च्या निवडणुकीत साम्य म्हणजे दोन्ही निवडणुकींदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप आणि दोन्हीकडे आलेली उजव्या विचारसरणीची सत्ता. भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर अशा दोन गटांत ही लढत होती आणि कुणीही कितीही नाकारले तरी या संघर्षास गडद राजकीय रंग होताच. आता निकालानंतर पुनःपुन्हा त्याच त्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप चिवडत बसण्यापेक्षा पुढच्या वाटचालीकडे लक्ष देणे हिताचे. शहरे, राष्ट्र यांचा ‘विकास’ म्हणजे निव्वळ अगडबंब प्रकल्प, योजना, जीडीपी अशाच तराजूंमध्ये मोजता येत नाही. ‘शहाणे करुनि सोडावे सकळजन’ असा वसा घेतलेल्या ज्या संस्था असतात त्यांनाही वर्धिष्णु, उज्ज्वल भवितव्य असावे लागते. प्राच्यविद्या, इतिहास, संस्कृती व इतर अनेक विषयांची दुर्मीळ हस्तलिखिते, पोथ्या, ग्रंथ असा अमूल्य ठेवा असलेल्या व जवळपास दोन शतकांचा वैभवशाली वारसा असलेल्या ‘एशियाटिक’चा समावेश अशा संस्थांमध्ये होतो. मात्र गेली काही वर्षे ही संस्था चर्चेत आहे ती तेथील समस्या, कर्मचाऱ्यांचे न होणारे पगार असल्या गोष्टींसाठी. समाज म्हणून लाज वाटावी, अशी ही स्थिती. सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील ‘एशियाटिक टुमारो’च्या विजयी चमूला या गोष्टींना तातडीने हात घालावा लागेल. संस्था अधिकाधिक लोकाभिमुख करावी लागेल. सोबतच महत्त्वाचे पथ्य पाळावे लागेल ते वैचारिक अस्पृश्यता दूर ठेवण्याचे. कारभार हाकताना या संस्थेवर कुठल्याही विशिष्ट रंगाचा शिक्का बसणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. केवळ एकाच विशिष्ट विचारवृत्तीचे पीठ अशी संस्थेची प्रतिमा होणे मुळीच हितावह नाही. ज्ञानाचे, अभ्यासाचे, विचारांचे खुले वारे मुक्तपणे वाहू देणारी संस्था अशी उद्याच्या ‘एशियाटिक’ची ओळख व्हावी. असे होणे सद्यकाळात दुर्मीळ... तरीही आशा ठेवायला हवी!