शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या, सिवर लाइन, पावसाळी नाल्यांचे चेंबर तुटलेल्या किवा झाकण नसलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे यावर तत्काळ झाकण बसवावे. तसे ओसीडब्ल्यूने खोदकाम करून ठेवलेल्या ठिकाणी बॅरिकेडस लावावे. शिकस्त इमारती पाडण्याची कारवाई करावी. याप्रकरणांमध्ये हयगय करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश महापालिकेचे सत्तापक्ष नेते नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांनी दिले आहेत.
पहिल्याच मुसळधार पावसानंतर महापालिकेच्या यंत्रणेची पोलखोल झाल्यानंतर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. महापौर नीता ठाकरे यांनी सोमवारी लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील नगरसेवक व अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.गुरुवारी अवघ्या काही तासांत झालेल्या ७०.६ मिमी पावसामुळे शहरातील अनेक रस्ते, उड्डाणपुलाखालील मार्ग आणि निवासी वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर महापौरांनी ही विशेष आढावा बैठक घेतली. नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर तसेच वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. विशेषतः मटण बाजार परिसरातील अतिक्रमणे हटवून संबंधितांचे साहित्य जप्त करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, बैठकीत लक्ष्मीनगर झोनच्या सभापती लक्ष्मी यादव यांनी नाल्यांमधून काढलेला गाळ आणि कचरा अनेक दिवस नाल्यांच्या काठावरच पडून राहत असल्याने पावसात तो पुन्हा नाल्यांमध्ये वाहून जात असल्याची तक्रार केली. धरमपेठ झोनच्या बैठकीत सभापती धनश्री देशपांडे यांनी नालेसफाईतील त्रुटी, सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता याकडे लक्ष वेधले.