पंडवानी परंपरेची सम्राज्ञी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पंडवानी परंपरेची सम्राज्ञी
तात एक तंबोरी. गळ्यात पारंपरिक माळ, पायात घुंगरांचं पैंजण. पान खाऊन रंगलेले ओठ, दात. काठापदराची साधीशी साडी नेसून तीजनबाई रंगमंचावर आल्या की प्रेक्षकांना थेट महाभारतात घेऊन जात. त्यांची तंबोरी कधी भीमाची गदा होई, कधी अर्जुनाचे धनुष्य. कधी त्या भीम होऊन पहाडी आवाजात दु:शासनाला ललकारत, तर कधी वस्त्रहरण झालेल्या द्रौपदीचा विलाप प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवत. हे सारं त्यांच्या निधनामुळे कायमचं शांत झालं. तीजनबाई छत्तीसगडच्या बहेलिया पारधी आदिवासी समुदायात जन्मल्या. आजोबा बृजलाल गावोगावी हिडून पंडवानी सादर करायचे. पंडवानी म्हणजे महाभारतातल्या कथांचं छत्तीसगडी हिंदीमधलं सादरीकरण. छोटी तीजनबाई त्यांच्यामागे जाई. तेराव्या वर्षी त्यांनी पहिलं सादरीकरण केलं. वेदमती शैलीमध्ये महिलांनी जमिनीवर बसून पंडवानी सादर करायची असते, तर पुरुषांनी कापालिक शैलीत उभे राहून. तीजनबाईंनी ही परंपरा मोडीत काढली. त्यांनी आयुष्यभर उभं राहून पंडवानी सादर केली. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात मोठे आघात सोसले. बाराव्या वर्षी झालेला बालविवाह टिकला नाही. मुलांना एकटीने कष्टाने वाढवलं. त्यांच्या समाजाने त्यांना वाळीत टाकलं होतं. त्या या सगळ्याला पुरून उरल्या. लोकांना तीजनबाईंचं सादरीकरण प्रचंड आवडलं. गावोगावी निमंत्रणं येऊ लागली. १९७१ मध्ये भिलाई महोत्सवातील सादरीकरणाने त्यांचं आयुष्यच बदललं. देशभरात त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. दूरदर्शनवर त्या दिसू लागल्या. १९८५ मध्ये पॅरिसमधील भारत महोत्सवात त्या झळकल्या. अनेक देशांत त्यांनी पंडवानी पोहोचवली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पंडवानी पाहून त्यांचं मनापासून कौतुक केलं होतं. पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या तीजनबाई कधी शाळेत गेल्या नव्हत्या; पण त्यांना खैरागड विद्यापीठाची डीलिट प्राप्त झाली होती. मौखिक परंपरेमधून देशातील समृद्ध लोककला जपणाऱ्या अन् त्यात मोठी भर घालून ती जगभर पोहोचवणाऱ्या तीजनबाईंना भावपूर्ण आदरांजली.

पंडवानी परंपरेची सम्राज्ञी



पंडवानी परंपरेची सम्राज्ञी