Festival Reviving Maharashtras Identity Through Wari
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची अस्मिता
महाराष्ट्र टाइम्स•
‘वारी ही केवळ महाराष्ट्राची ओळख नाही, तर ती आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची जिवंत परंपरा आहे. मराठी भाषा, साहित्य आणि समाजमन घडविण्याचे ऐतिहासिक कार्य संतांनी केले. ज्ञानेश्वरी, गाथेसह संत साहित्यावरच मराठी साहित्याचा भक्कम पाया उभा आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राष्ट्रीय पुस्तक न्यास ( एनबीटी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि समर्थ युवाफाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी, पुस्तक वारी’ या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय ‘सक्षम महिला, समृद्ध साहित्य दिंडी’चा प्रारंभ उत्साहात झाला. उद्घाटनानंतर विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताका फडकवत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ‘एनएसएस’चे संचालक डॉ. गणेश भामे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक डॉ. सविता कुलकर्णी, ‘संवाद’चे सुनील महाजन आदी या वेळी उपस्थित होते.सोमण म्हणाले, ‘या उपक्रमातून मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार असून, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रणही वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.’
डॉ. काळकर यांनी विद्यार्थ्यांना वारीकडे ‘जीवनाची इंटर्नशिप’ म्हणून पाहण्याचे आवाहन केले.