सरकारी रुग्णालयांना मिळणार रेटिंग

महाराष्ट्र टाइम्स
सरकारी रुग्णालयांना मिळणार रेटिंग
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि उपचारांचा दर्जा अधिक पारदर्शक व सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व ६२३ शासकीय रुग्णालयांचे मूल्यमापन करून त्यांना फाइव्ह-स्टार मानांकन देणारी ‘स्टार रेटिंग’ प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

या निर्णयांतर्गत रुग्णालयांचे भौतिक आणि डिजिटल डेटाबेसच्या आधारे वर्षातून दोनदा, जानेवारी आणि ऑगस्ट महिन्यात मूल्यमापन केले जाईल. सर्व दहा निकषांमध्ये पूर्ण गुण मिळवणाऱ्या रुग्णालयाला फाइव्ह-स्टार रेटिंग दिले जाईल. तसेच चार किंवा त्यापेक्षा जास्त स्टार मिळवणाऱ्या उत्कृष्ट रुग्णालयांचा गौरवपत्र देऊन सन्मान केला जाईल.
रेटिंगसाठी बायोमेट्रिक हजेरीनुसार किमान ८० टक्के डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तसेच ८० टक्के विशेषोपचार सेवांची उपलब्धता तपासली जाणार आहे. आवश्यक औषध सूचीतील किमान ८० टक्के औषधांचा साठा, प्रयोगशाळा, एक्स-रे व ईसीजी सेवांचा प्रत्यक्ष वापर, बाह्यरुग्ण संख्या आणि आंतररुग्ण विभागातील खाटांची व्याप्ती हे निकषही ग्राह्य धरले जातील. दरमहा होणाऱ्या सुरक्षित प्रसूती आणि मोठ्या शस्त्रक्रियांची समाधानकारक संख्या, स्वच्छ परिसर, स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, पिण्याचे पाणी, ऑक्सिजन सुविधा आणि बॅकअप वीजपुरवठा यांचाही मूल्यमापनात समावेश असेल.

उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांशी फोनवर संपर्क साधून डॉक्टरांचे वर्तन, रुग्णालयातील स्वच्छता, औषधपुरवठा आणि मोफत चाचण्यांबाबत थेट अभिप्राय घेतला जाईल. या अभिप्रायात पाचपैकी किमान चार गुण मिळवणे रुग्णालयांसाठी बंधनकारक असेल.

या प्रणालीमध्ये राज्यातील ३७३ ग्रामीण रुग्णालये, १०६ उपजिल्हा रुग्णालये, २० जिल्हा रुग्णालये, २४ स्त्री रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, ७८ ट्रॉमा केअर सेंटर, १२ कामगार विमा रुग्णालये आणि २ संदर्भ सेवा रुग्णालये अशा एकूण ६२३ रुग्णालयांचा समावेश आहे.