दोन अनाथ मुलींच्या आयुष्याची नवी सुरुवात

महाराष्ट्र टाइम्स
wedding ceremony of two orphan girls at shree shraddhanand orphanage
श्रद्धानंद अनाथालयात वाढलेल्या शारदा (वय २०) आणि सरिता (वय १९) (नावे बदललेली) या दोन मुली आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहेत. येत्या ३१ जुलै रोजी सकाळी ११.१९ वाजता त्यांचा विवाहसोहळा श्रद्धानंद अनाथालयात पार पडणार आहे. दोघींच्या लग्नाची तयारी सध्या अनाथालयात उत्साहात सुरू आहे.

निराधार, आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या तसेच संकटात सापडलेल्या मुलींचा सांभाळ श्रद्धानंद अनाथालय गेल्या १०० वर्षांपासून करीत आहे. मुलींना शिक्षण, आधार आणि स्वावलंबन देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्था करते. त्यांच्या इच्छेनुसार विवाह लावून देण्याची परंपराही येथे जोपासली जाते.
२९ जुलैला मेहंदी, ३० जुलैला हळद आणि ३१ जुलैला विवाहसोहळा होईल. शारदा अकोला येथे, तर सरिता नागपूर जिल्ह्यात सासरी जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष गोपाळ बुटी, उपाध्यक्ष मीरा खडक्कार, कार्याध्यक्ष बालाजी बुटी, सचिव डॉ. निशा बुटी, सहसचिव शिवांगी बुटी, कोषाध्यक्ष बी. सी. भरतीया, ॲड. कल्पना पाठक, डॉ. मृदुला बापट, डॉ. सोनपुरे, कल्याणी बुटी, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना मेश्राम, प्रतिमा दिवाणजी आदींच्या प्रयत्नातून हा विवाह सोहळा पार पडणार आहे.