Demand For Strict Inquiry Into Junior Engineers Suicide
कनिष्ठ अभियंत्याच्या आत्महत्येची चौकशी करा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
रामटेक पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सौरभ धर्मराज पवार यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने केली आहे. शुक्रवारी, २४ जुलै रोजी शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे रामटेक पोलिसांच्या तांत्रिक तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात येते. पोलिस तपास सुरू असतानाच जिल्हा परिषदेनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. मात्र, तपासात दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.या भेटीत पारधी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा झाली. पारधी बेड्यांवरील मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, अंगणवाडी, शाळा, शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक कागदपत्रे, रोजगार, डिजिटल ई-लायब्ररी, महिला व बालकल्याण तसेच सामाजिक न्यायाशी संबंधित विषय सीईओंच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समन्वय बैठक तातडीने बोलावावी, अशी मागणी करण्यात आली. प्रत्येक विभागाने पारधी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करावी, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. सीईओ महामुनी यांनी सर्व मागण्यांची दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.