सीताफळाचा हंगाम सुरू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
the season of custard apples market filled with quality fruits
पुणे : सीताफळाच्या हंगामाला सुरुवात झाली असून, घाऊक बाजारात आवक वाढू लागली आहे. मार्केट यार्डाच्या फळबाजारात दिवसाला चार ते पाच टन सीताफळांची आवक होत आहे. मात्र, आवक वाढूनही घाऊक बाजारातील दर स्थिर आहेत. मार्केट यार्डात पुरंदर, हवेली, शिरूर, जुन्नर; तसेच सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतून सीताफळाची आवक होत आहे.

पावसानंतर फळाचा दर्जा चांगला झाला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या आकाराची आणि गोड चवीची सीताफळे येत आहेत. घाऊक बाजारात दर्जानुसार प्रतिकिलो ३० ते १०० रुपये दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सीताफळाचा हा पहिला हंगाम असून, तो जून ते ऑगस्टपर्यंत असतो. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे घरगुती ग्राहकांची खरेदी काहीशी कमी आहे; मात्र; रबडी, बासुंदी आणि इतर प्रक्रिया उद्योगांकडून सीताफळाला चांगली मागणी आहे. याखेरीज सीताफळ महाराष्ट्राबाहेरही पाठविले जाते.