Intelligence On Irans Plot To Assassinate Trump Causes Stir
ट्रम्प यांच्या हत्येचा इराणचा कट?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी इराणने नवी योजना आखल्याचा आरोप करणारी ताजी गुप्तचर माहिती इस्रायलने अमेरिकेला दिली आहे, असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, इस्रायलने या आठवड्यात ही गुप्तचर माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांना दिली. ‘सीएनएन’ने या प्रकरणाशी संबंधित दोन सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हा इशारा याच आठवड्यात देण्यात आला असून, त्यामध्ये ट्रम्प यांच्या हत्येच्या कथित विशिष्ट कटाचा उल्लेख आहे. मात्र, या कथित कटाचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी या माहितीची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही; तसेच इस्रायलकडून माहिती मिळण्यापूर्वी त्या कथित कटावर अमेरिकेच्या यंत्रणांकडून कोणतेही विशेष लक्ष ठेवले जात नव्हते. या वृत्तानुसार, काही अमेरिकी अधिकाऱ्यांचे मत आहे, की इराणविरोधात अमेरिकेने लष्करी कारवाई अधिक तीव्र करावी यासाठी ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याच्या इस्रायलच्या व्यापक प्रयत्नांचाही हा एक भाग असू शकतो. दरम्यान, ‘व्हाइट हाऊस’ने या कथित गुप्तचर माहितीवर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.