महारेरानंतर जिल्हा परिषदेचेही खोटे सही-शिक्के

महाराष्ट्र टाइम्स
महारेरानंतर जिल्हा परिषदेचेही खोटे सही-शिक्के
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
कल्याण-डोंबिवलीत महारेराच्या खोट्या प्रमाणपत्रांआधारे इमारती अधिकृत असल्याचे भासवून हजारो ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर असतानाच, आता जिल्हा परिषदेचे खोटे सही-शिक्के वापरून ग्रामीण भागात इमारती उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी रहिवाशांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी रामचंद्र माने, लक्ष्मण मिसाळ, मोहनलाल चौधरी आणि रामदास टेकाळे या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांना अटक झालेली नाही. आरोपींना अटक झाली नाही, तर पोलिस उपायुक्तांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

डोंबिवलीच्या सागाव परिसरातील चाळी पाडून त्या जागी इमारत बांधून देण्याचे आश्वासन रामचंद्र माने यांनी २०१६मध्ये दिले होते. त्याप्रमाणे इमारत बांधून दिली. मात्र वाढीव जागेसाठी जास्त पैसे घेतले. यासाठी रहिवाशांना कर्जही मिळवून दिले. मात्र व्याजदर जास्त असल्याने रहिवाशांनी दुसऱ्या बँकेत कर्जासाठी अर्ज केल्यानंतर, बँकेने कागदपत्रांवर हरकत घेतली. यामुळे रहिवाशांनी जिल्हा परिषदेकडे चौकशी केली असता, सदर कागदपत्रांवरील सही-शिक्के जिल्हा परिषदेने दिलेले नसून ही इमारत अनधिकृत असल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केल्याने, रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली. विकासकाने आपली फसवणूक केल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले.
याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात प्रणाली जाधव यांनी तक्रार केली आहे. मात्र विकासकाला राजकीय पाठिंबा असल्याने त्याला अटक होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. लवकरात लवकर या प्रकरणी कारवाई झाली नाही, तर पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. या घटनेनंतर खळबळ माजली आहे. भूमाफियांनी महारेराप्रमाणेच जिल्हा परिषदेची अधिकृत कागदपत्रे असल्याचे भासवून किती रहिवाशांची फसवणूक केली असेल, अशी धास्ती आता या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.