मुंबई : श्रीलंकेतील दोन क्रिकेट कसोटींच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी होईल. दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीस भारताच्या टी-२० संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले.
श्रीलंकेतील कसोटी मालिका भारतीय फिरकी गोलंदाजांची; तसेच फलंदाजांच्या फिरकीचा सामना करण्याच्या क्षमतेची चाचणी असेल. ही मालिका १५ ऑगस्टपासून होणार आहे. ‘श्रीलंकेतील मालिकेसाठी निवड समिती दोन दिवस चर्चा करणार आहे. त्यानंतर मंगळवारी संघाची घोषणा होईल,’ असे सैकिया यांनी सांगितले.दरम्यान, भारताच्या टी-२०मधील कामगिरीचा आढावा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्याचबरोबर वन-डेमधील कामगिरीचेही विश्लेषण होईल. श्रेयस अय्यर कर्णधार असलेला भारतीय संघ आयर्लंडमधील टी-२० मालिकेत ०-२ आणि इंग्लंडमधील टी-२० मालिकेत ०-४ असा पराभूत झाला होता. त्यानंतर शुभमन गिल कर्णधार असलेल्या वन-डे संघाने इंग्लंडमधील मालिका १-२ अशी गमावली होती.
इंग्लंड, आयर्लंड; तसेच झिम्बाब्वेतील कामगिरीचा आढावा ऑगस्टच्या सुरुवातीस होईल. काही सहायकांचा करारही संपला आहे. बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल, त्यात नेमके काय चुकले याचे सखोल विश्लेषण होईल. संघ झिम्बाब्वेतून परतल्यावर ही प्रक्रिया सुरू होईल, असे सैकिया यांनी सांगितले.