अमेरिकेचा जहाजावर हल्ला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
us attack on iranian ship tensions rise
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या वाटाघाटींचे वर्णन ‘आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्वांत गंभीर वाटाघाटी’ असे केले. ‘युद्ध संपवण्याची मला घाई नाही,’ असेही ते म्हणाले. दुसरीकडे, इराणनेही ताठर भूमिका कायम ठेवली आहे. ‘इराण अमेरिकेच्या दादागिरीपुढे झुकणार नाही’, अशी शपथ घेत, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी चीन आणि रशिया या दोन जागतिक महाशक्तींसोबत सुरू असलेल्या चर्चांकडे लक्ष वेधले. ‘इस्लामिक प्रजासत्ताक धमक्यांना घाबरत नाही किंवा दबावापुढे झुकणारही नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.

हंगामी शांतता करार अपयशी ठरल्यानंतर अमेरिका व इराणमध्ये नव्याने उफाळून आलेला संघर्ष कायम आहे. अमेरिकेने इराणी बंदरांची केलेली घेराबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका व्यापारी जहाजावर अमेरिकेने शुक्रवारी गोळीबार केला. दुसरीकडे, इराणने पर्शियन आखाताभोवतीच्या अमेरिकी तळांना लक्ष्य केले.
उभय देशांत सलग तेराव्या दिवशी हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. ‘एमटी लाव्हिन या जहाजाने किमान चारवेळा घेराबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अमेरिकी सैन्याने ओमानच्या आखातात ते जहाज निकामी केले,’ असे अमेरिकी मध्यवर्ती कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितले. तांबड्या समुद्रात सौदी तेलवाहू जहाजांवर इराणसमर्थित हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबियाने येमेनमधील शहरावर हल्ला केला.

चार जहाजे लक्ष्य

तेहरान : इराणी रिव्होल्युशनरी गार्डने गेल्या २४ तासांत होर्मुझमध्येे चार मालवाहू जहाजांना लक्ष्य केले. त्यामुळे या जहाजांना थांबून राहावे लागले किंवा मार्ग बदलावा लागला. या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही.