जायकवाडी धरणात ४४ टक्के पाणीसाठा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
जायकवाडी धरणात ४४ टक्के पाणीसाठा
छत्रपती संभाजीनगर : उर्ध्व भागातील धरणांतून जायकवाडी धरणात पाण्याची आवक कायम आहे. जायकवाडीत ४३.९१ टक्के पाणीसाठा झाला असून, ८५ हजार ७२७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे, अशी माहिती ‘कडा’ प्रशासनाने दिली आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

मराठवाड्यात मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस झाला आहे. त्यामुळे लघु व मध्यम धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. मोठ्या धरणातही कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. जायकवाडी धरणात तीन दिवसांपासून पाण्याची आवक वाढली आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर उर्ध्व भागातील धरणे भरली आहेत. या धरणातून विसर्ग होत आहे. त्यामुळे जायकवाडीकडे पाण्याचा ओघ सुरू आहे. गंगापूर धरणातून शनिवारी ८३७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वर बंधारा ६४ हजार ७२६ आणि भंडारदरा धरणातून ११ हजार ९२२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणात एकूण ८५ हजार ७२७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे; तसेच धरणाची पाणीपातळी ४३.९१ टक्के झाली आहे, अशी माहिती ‘कडा’ विभागाने दिली आहे.
दरम्यान, पुढील तीन दिवस विभागात तुरळक पाऊस होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड जिल्ह्यात २७ ते २९ जुलै दरम्यान जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तुरळक पावसावर पिके तग धरून आहेत. मात्र, पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले.