बॉक्सिंगमध्ये सचिनची आगेकूच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
sachins unique victory indias brilliance at the commonwealth games
ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. जलतरणपटू पदकापासून दूर राहिले. बॉक्सर सचिन सिवाचला सलामीला संघर्ष करावा लागला. बोल्समधील भारतीय महिलांनी दुहेरीत तिसरा विजय मिळवून दिलासा दिला.

सचिनला कडवे आव्हान
सचिनने बॉक्सिंगमधील ६० किलो वजनी गटाच्या स्पर्धेत कॅनडाच्या केओमा अल-अहमदी याचे कडवे आव्हान ४-१ असे परतवून आगेकूच केली. ‘लढत नक्कीच खडतर होती; मात्र यापूर्वी त्याच्याविरुद्ध जिंकल्यामुळे यशाचा आत्मविश्वास होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ती मालिका कायम ठेवली याचे समाधान आहे,’ असे सचिनने नमूद केले.

बोल्समध्ये यश कायम

रुपाराणी तिर्की आणि पिंकीसिंह या भारतीय जोडीने बोल्सच्या महिला दुहेरीतील यशोमालिका कायम राखली. त्यांनी तोंगाला ५-२, ०-६, १-० असे पराभूत केले. भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. त्यांची आता नामिबिया आणि इंग्लंडविरुद्धची लढत शिल्लक आहे. पुतुल सोनमोवालने शुक्रवारी रात्री दुसरा विजय मिळवताना अलेक्झांडरला पराभूत केले.

जलतरणात पिछेहाट

जलतरणपटू श्रीहरी नटराजचे ५० मीटर बॅकस्ट्रोकमधील आव्हान शुक्रवारी रात्री उपांत्य फेरीतच आटोपले. तो २५.२९ सेकंद या वेळेसह सर्वांगीण क्रमवारीत ११वा आला. दक्षण शशिकुमार आणि आर्यन नेहरा ४०० मीटर फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीपासून दूर राहिले. शशिकुमार (३ मि. ५८.०९ सेकंद) आणि आर्यन (४ मि. ०.२६ सेकंद) हे अनुक्रमे १५वे आणि १६वे आले.

बुदिगोनाचे पदक हुकले

कार्तिक बुदिगोना १०० मीटर फ्रीस्टाइल ‘एस१३’च्या अंतिम फेरीत चौथा आला. त्याची वेळ ५७.५७ सेकंद होती, ब्राँझ विजेत्या मॅथ्यू रेडफर्नने (इंग्लंड) ५६.८६ सेकंदांत शर्यत पूर्ण केली होती.