फडणवीस तातडीने दिल्लीत

महाराष्ट्र टाइम्स
फडणवीस तातडीने दिल्लीत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा दिल्लीचा धावता दौरा केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा होत असतानाच फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीत बोलावून घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व चर्चांना उधाण आले. सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेऊन मुख्यमंत्री लगेच मुंबईला परतल्याची माहिती आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) जंतरमंतरवर आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी राजीनामा दिला. त्याच सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले. त्यांचा हा अचानक दिल्ली दौरा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रस्तावित फेरबदलांच्या दृष्टीने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला.
फडणवीस दिल्लीत येणार का, शिक्षणमंत्री होणार का, यांसारख्या अफवांचे दिल्लीत पेव फुटले. आपण सन २०२९पर्यंत महाराष्ट्र सोडणार नाही, हे फडणवीस यांनी याआधी वारंवार सांगितले आहे. मात्र, शनिवारी प्रधान यांच्या राजीनाम्याच्या दिवशीच त्यांनी दिल्ली गाठून पक्षनेतृत्वाची भेट घेतल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला. फडणवीस यांना तडकाफडकी दिल्लीत केंद्र सरकारमध्ये बोलावून घेण्याची कोणतीही योजना सध्या नाही, असे भाजप सूत्रांनी सांगितले.