अव्वल मानांकित अर्जुन श्रीगडीवारने स्वातंत्र्य सैनिक जवाहरलाल दर्डा स्मृती सब-ज्युनियर गटाच्या राज्य बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला.
यवतमाळ येथे ही स्पर्धा झाली. अर्जुनने १५ वर्षांखालील एकेरीचे आणि स्वरा मोरेच्या साथीत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. एकेरीच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित अर्जुन श्रीगडीवारने तिसऱ्या मानांकित हृदान पाडवेववर १५-१२, १०-१५, १५-१० अशी मात केली; तसेच मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत अर्जुन-स्वरा यांनी खुश दीक्षित-द्रुवी कुंबेफळकर यांच्यावर १५-११, १५-११ असा विजय मिळवला. समन्वयाला जेतेपद
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत समन्वया धनंजयने जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत दहाव्या मानांकित समन्वयाने तिसऱ्या मानांकित सान्वी घाटेचा १५-११, १५-८ असा पराभव केला. एकेरीतील जेतेपदाची संधी गेल्यानंतर सान्वीने रुद्राणीराजे निंबाळकरच्या साथीत १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे जेतेपद मिळवले. अंतिम लढतीत सान्वी-रुद्राणीराजे या अव्वल मानांकितांनी इमान मोटरवाला-रुद्रा गावडे यांच्यावर १५-१३, १५-११ असा विजय मिळवला.
शरयूला उपविजेतेपद
पुण्याच्या शरयू रांजणेला १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. द्वितीय मानांकित अनुष्का इप्तेने अंतिम लढतीत अव्वल मानांकित शरयूवर १५-१२, १५-१३ अशी मात केली. सतरा वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत मात्र शरयूने सोयरा शेलारच्या साथीत विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत शरयू-सोयरा या अव्वल मानांकितांनी मनस्वी चौहान-टिया शेठ या द्वितीय मानांकितांवर १५-८, १५-१० अशी मात केली.
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत हृदान पाडवे-विहान कोल्हाडे यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत मयंक राजपूत-प्रग्नय शिंदे यांनी हृदान-विहान या अव्वल मानांकितांवर १५-११, १५-१२ अशी मात केली. स्पर्धेतील सतरा वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित कृत्य पटेलने अभिग्यान सिंघावर १८-१६, १३-१५, १५-९ अशी मात केली.
स्पर्धेतील सतरा वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत जेतेपद पटकावणाऱ्या सोयरा शेलारने सयाजी शेलारच्या साथीत मिश्र गटाचेही जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत सोयरा-सयाजी या अव्वल मानांकितांनी शर्वरी सुरवसे-राघवेंद्र यादव या द्वितीय मानांकितांर १५-६, १५-९ अशी मात केली.