संयम अन् परिश्रम महत्त्वाचे

महाराष्ट्र टाइम्स
संयम अन् परिश्रम महत्त्वाचे
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘चॅम्पियन होणे सोपे नाही, यशोशिखर गाठण्यासाठी त्याग, शिस्त, संयम आणि कठोर मेहनत खूप महत्त्वाची असते,’ अशा शब्दांत ऑलिम्पिक पदकविजेती ‘फुलराणी’ साईना नेहवाल हिने यशाचा मंत्र सांगितला.

छत्रभूज नरसी स्कूल येथे ‘चॅम्पियन कनेक्ट’ या उपक्रमासाठी साईना आली होती. या वेळी स्कूलचे अध्यक्ष सुजय जयराज, साईनाची आई उषाराणी आदी उपस्थित होते. मुलांचे मोबाइल आणि टीव्हीमुळे लक्ष विचलित होत आहे, यावर साईना म्हणाली, ‘चॅम्पियन होणे सोपे नाही, त्यासाठी पालकांनी मुलांना मोबाइल-टीव्हीपासून सोळा-सतरा वयापर्यंत दूर ठेवायला हवे. पालकांनी मुलांना मैदानावर पाठवायला हवे. त्यांना गुंतवून ठेवले पाहिजे. हळूहळू मुलांना खेळ, स्पर्धा आवडायला लागतील. खेळात करिअर करायचे असेल, तर पालकांनाही अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल.’
खेळात यश-अपयश येत असते. दडपण असते. तुम्ही हार मानू नका, परिश्रम घेत राहा, लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घ्या, असा सल्ला साईनाने दिला. ‘अभ्यास तर सर्वच करतात. मात्र, तुम्ही काहीतरी असामान्य करा, स्वत:चे नाव करा, तुम्हाला यश मिळवायचे असेल, तर इतरांपेक्षा वेगळे व्हावे लागेल. ते सोपे नाही. लोक तुम्हाला मागे खेचतील, टीका करतील. मात्र, तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून दूर जाऊ नका. कठोर मेहनत घ्या, आव्हानांसाठी सज्ज राहा, असे साईनाने सांगितले. प्रशिक्षक होणे सोपे नाही, तूर्त तरी त्यावर फार विचार करत नाही. मात्र, दोन-तीन वर्षांनी पाहू, असे साईनाने सांगितले.

येत्या २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कोणाकडून पदकाची अपेक्षा आहेत, या प्रश्नावर साईना म्हणाली, ‘सिंधू तर आहेच; पण त्यासोबतच उन्नती हुडा, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहे.’ प्रशिक्षक होणे सोपे नाही, तूर्त तरी त्यावर फार विचार करत नाही. मात्र, दोन-तीन वर्षांनी पाहू, असेही साईनाने या वेळी सांगितले.