इराणवर गूढ हवाई हल्ले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
इराणवर गूढ हवाई हल्ले
अमेरिकेने आपले हल्ले संपल्याचे जाहीर केल्यानंतर इराणवर झालेल्या हवाई हल्ल्यांच्या मालिकेची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. त्यामुळे इराणवर हे गूढ हल्ले कोणी केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या दफनविधीची तयारी सुरू असतानाच, गुरुवारी करण्यात आलेल्या हल्ल्यांनी दक्षिण इराणमधील विविध भागांना लक्ष्य केले. या देशाच्या धर्मसत्तेने या हल्ल्यांसाठी थेटपणे कोणालाही जबाबदार धरलेले नाही. या हल्ल्यांबाबत संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) शुक्रवारी त्वरित कोणताही प्रतिसाद दिला नाही. इराण युद्धात सहभागी असलेल्या इस्रायलनेदेखील इराणवरील या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडने गुरुवारी स्थानिक इराणी वेळेनुसार सकाळी ६.३०च्या सुमारास सांगितले की, त्यांनी हल्ल्यांची एक फेरी पूर्ण केली आहे, ज्यामध्ये सुमारे ९० लक्ष्यांवर हल्ले झाले. त्यानंतर लगेचच इराणी वृत्तसंस्था आणि सरकारी माध्यमांनी हवाई हल्ले व स्फोटांच्या मालिकेचे वृत्त दिले. इराणने गुरुवारी या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून मध्यपूर्वेत बहरीन, जॉर्डन, कुवेत आणि कतारला लक्ष्य करत हल्ल्यांची व्यापक फेरी सुरू केली. इराणच्या हल्ल्यानंतर ‘यूएई’चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान लगेचच आपल्या देशाच्या शासकांसोबत बैठकीसाठी कुवेतला गेले.

धमकीचा सूर कायम

‘यूएईला अमेरिकेसोबतच्या सहकार्याची किंमत मोजावी लागेल’, अशी धमकी इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य आणि निमलष्करी रिव्होल्युशनरी गार्डचे माजी कमांडर इस्माईल कौसारी यांनी शुक्रवारी दिली. तसे वृत्त इराणी सरकारी माध्यमांनी दिले आहे. अमेरिकेच्या अलीकडच्या हल्ल्यांमध्ये यूएईची पडद्यामागील भूमिका असल्याचा आरोपही कौसारी यांनी केला.

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे अखेर मृत्यूनंतर चार महिन्यांनी इराणचे सर्वांत पवित्र स्थळ असलेल्या मशहद येथे दफन करण्यात आले. मात्र, खामेनी यांच्या अंत्यविधी कार्यक्रमांत खामेनी यांचे पुत्र आणि सर्वोच्च नेतेपदाचे उत्तराधिकारी मोजतबा हे दिसले नाहीत.