Will The Brazilian Football Team Play A Match In India
ब्राझीलचा फुटबॉल संघभारतात खेळण्याची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
ब्राझीलचा फुटबॉल संघ काही महिन्यांत भारतात सामना खेळण्याची शक्यता आहे. ब्राझीलच्या संघाचे भारतात अनेक चाहते आहेत. त्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी ही लढत आयोजित करण्याबाबत ब्राझील संघटना गांभीर्याने विचार करीत असल्याचे वृत्त आहे.
ब्राझिलियन फुटबॉल महासंघ आणि भारतातील प्रवर्तक यांच्यातील सामन्याच्या आयोजनाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे वृत्त ईएसपीएन ब्राझील या संकेतस्थळाने दिले आहे. ही लढत सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लढतीबाबत सातत्याने चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान ब्राझील संघाला समाजमाध्यमांवरुन प्रोत्साहित करण्यात भारतीय आघाडीवर होते. त्यामुळे भारतास पसंती दिली जात आहे. जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने सप्टेंबरचा अखेरचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी राखून ठेवला आहे. ब्राझील महासंघाने यापूर्वीच ऑस्ट्रेलियातील दोन लढती निश्चित केल्या आहेत. त्या लढती २५ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबरला होतील. आता तिसरी लढत भारतात होऊ शकते, असे संकेत दिले जात आहेत.
ब्राझीलची ही लढत कोणाविरुद्ध होणार हे अद्याप निश्चित नाही; मात्र भारताप्रमाणेच बांगलादेश, सिंगापूर; तसेच कतार ब्राझीलविरुद्धच्या सामन्यासाठी प्रयत्नशील होते; मात्र ब्राझील महासंघाची पसंती भारतास आहे. अन्य देशांसह चर्चा सुरू आहे; पण भारताने खूपच आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. भारतासह चर्चा वर्ल्ड कप सुरू होण्याच्या सुमारासच सुरू झाली होती.