Concrete Roadwork Accelerated In Pratap Nagar Municipal Decision
दोन वर्षांनंतर काँक्रिटीकरणाला वेग
महाराष्ट्र टाइम्स•
प्रतापनगर येथील जवळपास दोन वर्षांपासून रखडलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. ‘मटा’ने हा विषय सातत्याने लावून धरल्यानंतर महापालिका प्रशासन सक्रिय झाले.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदाराला काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.प्रतापनगरला ऑरेंजसिटी स्ट्रीटशी जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी , धूळ आणि दैनंदिन गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. गर्दीच्या वेळेत या मार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या.
पाहणीदरम्यान कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विलंबाबद्दल कंत्राटदाराला समज देण्यात आली असून कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना लवकरात लवकर सुरळीत वाहतुकीचा लाभ मिळेल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली. जागतिक बँकेकडील काही मंजुरी प्रलंबित असल्याने काम रखडल्याचे सांगण्यात आले. मात्र, अडथळे दूर करून कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंत्राटदाराने पुढील महिनाभरात कामाला अपेक्षित वेग देण्याचे आश्वासन दिले. या पाहणीनंतर प्रतापनगरातील नागरिकांना धूळ आणि वाहतूक कोंडीतून लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.