इथे रोजच आरोग्याशी खेळ

महाराष्ट्र टाइम्स
इथे रोजच आरोग्याशी खेळ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
खाद्यपदार्थ बनविताना स्वच्छता पाळली जावी, या निकषांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने अलीकडे शहरातील अनेक नामांकित रेस्टॉरंटवर कारवाईचा धडाका लावला आहे. नोंदणी प्रमाणपत्र, किचनमधील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अहवाल, पेस्ट कंट्रोल, कर्मचाऱ्यांचे एप्रॉन-टोपी, वैद्यकीय तपासणी अशी विविध कारणे दाखवत काही ठिकाणी परवाने निलंबित करण्यात आले.

या कारवायांचे नागरिकांकडून स्वागत होत असतानाच, शहरातील रस्तोरस्ती सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या ठेल्यांवरील अस्वच्छतेकडे एफडीएने कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेस्टॉरंटसाठी लागू असलेले स्वच्छतेचे निकष महत्त्वाचेच आहेत. मात्र, शहरातील अनेक ठेल्यांवर रोजच नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कडेला, नाल्यांच्या बाजूला किंवा कचऱ्याजवळ खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी पदार्थ झाकून ठेवले जात नाहीत. धूळ, धूर, माश्या आणि कीटकांच्या संपर्कात आलेले पदार्थ ग्राहकांना दिले जातात. विक्रेत्यांकडून हातमोजे, टोपी, एप्रॉन यांचा वापर होताना क्वचितच दिसतो. भांडी कुठे धुतली जातात, पाणी स्वच्छ आहे की नाही, अन्न कुठे आणि कोणत्या स्थितीत तयार होते, याची ग्राहकांना कोणतीही कल्पना नसते.

काही ठिकाणी सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जाते. उरलेले किंवा उष्टे अन्न परिसरातच फेकले जाते. त्यामुळे दुर्गंधी, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता वाढते. अंधाऱ्या, हवेशीर नसलेल्या खोल्यांत पदार्थ तयार करून विक्रीसाठी आणले जात असल्याच्याही तक्रारी आहेत.

एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांच्याकडे आल्यानंतर कारवायांना वेग आला आहे. त्यामुळे आता ही मोहीम केवळ मोठ्या रेस्टॉरंटपुरती मर्यादित न ठेवता खुल्या खाद्यव्यवसायांवरही राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. रोज हजारो नागरिक रस्त्यावरील खाद्यपदार्थ खातात. त्यामुळे स्वच्छता, पाणी, अन्नसाठवण आणि कचरा व्यवस्थापनाची काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. अन्यथा, एका बाजूला रेस्टॉरंटवर नियमांचा बडगा आणि दुसरीकडे ठेल्यांवर आरोग्याशी रोजचा खेळ, असे विसंगत चित्र कायम राहील, असाही मतप्रवाह आहे.