Fear Grips Residents As Knife Gang Strikes In Jayatala
जयताळ्यात कोयता गँगचा हैदोस
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
जयताळा परिसरात घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर आधीच कारवाई करावी आणि अशा टोळ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा परिसरातील महेंद्रा कॉलनीत शुक्रवारी रात्री कोयते आणि काठ्या घेऊन आलेल्या टोळीने हैदोस घातला. आरडाओरड करत दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीने नागरिकांना मारहाण केली, वाहनांची तोडफोड केली तसेच दुकान आणि ठेल्याचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शुभम ऊर्फ निंब निंबुळकर (रा. एकात्मतानगर), क्रिश कोटांगळे (रा. जयताळा), ऋत्विक हरणे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेंद्रा कॉलनीतील रहिवासी तुषार महेंद्र खरोले (वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुषार खरोले यांच्याकडे एमएच-३१-एफयू-९४४६ क्रमांकाची कार आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास शुभम, क्रिश, ऋत्विक आणि त्यांचे काही साथीदार महेंद्रा कॉलनी परिसरात आले. त्यांच्या हातात कोयते आणि काठ्या होत्या. त्यांनी मोठ्याने आरडाओरड सुरू केली. अचानक झालेल्या गोंधळामुळे परिसरातील नागरिक घराबाहेर डोकावू लागले. याचवेळी आरोपींनी काही नागरिकांना काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. परिसरातील अंड्याचा ठेला उलटवून नुकसान करण्यात आले. तसेच भावेश फोटो फ्रेम दुकानाचे शेड तोडण्यात आले.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. आरडाओरड ऐकून तुषार खरोले घराबाहेर आले. त्यांनी आरोपींना हटकण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींपैकी एक जण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून आल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच खरोले यांनी तत्काळ घरात शिरून स्वतःचा बचाव केला. त्यानंतर आरोपींपैकी एकाने त्यांच्या कारची काच फोडली. या टोळीने टकचंद लालुजी राऊत आणि ऋत्विक देशमुख यांनाही काठीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या वेळी अनेकांनी घरांचे दरवाजे बंद करून आतच थांबणे पसंत केले. परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते.