Opportunity For Students To Register Despite Pending Final Year Results
निकालाविनाही पदवी प्रवेश
महाराष्ट्र टाइम्स•
अंतिम वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमाचा निकाल अद्याप जाहीर न झाल्यामुळे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीईटी कक्षाने अशा विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा असतानाही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
राज्यातील शासकीय, अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित संस्थांमधील थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरुवातीला २२ ते २३ जुलैदरम्यान नोंदणी आणि अर्ज निश्चितीची मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक पदविका विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षाचे निकाल अद्याप जाहीर न झाल्याने त्यांना अर्जच करता आला नव्हता. याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी सीईटी कक्षाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यामुळे सीईटी कक्षाने हरकती नोंदविण्याच्या कालावधीतच निकाल प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करून अर्ज निश्चित करण्याची विशेष संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी २८ जुलैपर्यंत, तर थेट द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थी २९ जुलैपर्यंत अर्ज नोंदवू शकणार आहेत.