मारेकऱ्यांना ३१पर्यंत पोलिस कोठडी

महाराष्ट्र टाइम्स
pawan survanshi murder case 7 arrested along with 2 juveniles
मानेवाडा घाट परिसरात टोळीयुद्धातून पवन निकेश सूर्यवंशी (वय १८, रा. पंतप्रधान आवास योजना, वाठोडा) याची हत्या केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

कुणाल धनराज चौरसिया (वय २४, रा. जुना ज्ञानेश्वरनगर), वेदांत संदीप कापटे (वय १९, रा. महाकालीनगर), रौनक रमेश राव (वय २१, रा. जय गुरुदेवनगर), यश दिलीप लोदे (वय २५, रा. न्यू ज्ञानेश्वरनगर), देवांश प्रवीण श्रीरामे (वय २१, रा. मनीषनगर), प्रज्ज्वल गिरीश नायडू (वय २०, रा. बेलतरोडी) आणि अनुराग पराग शास्त्रकार (वय २०, रा. जानकीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनुसार, काही दिवसांपूर्वी वाहनाला कट लागल्यावरून दोन्ही गटांत वाद झाला होता. त्यानंतर पवन आपल्याला ठार मारेल, अशी भीती वाटल्याने चौरसियाने साथीदारांसह हत्येचा कट आखला. शनिवारी सायंकाळी वाद मिटविण्याच्या बहाण्याने पवनला घाटावर बोलाविण्यात आले. पवनसोबत अमन काळे, अजय काळे आणि अजय सोलंकी गेले होते. आरोपींनी त्यांना घेरून पवन व अमनवर शस्त्राने वार केले. पवनचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अमन गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.