Pedestrian Bridge In Mahalaxmi Makes Public Transport Easier
पायपीट वाचणार!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
महालक्ष्मी येथे मोनोरेल, मेट्रो-३ आणि पश्चिम रेल्वेचे महालक्ष्मी स्थानक यांना जोडणारा देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त (सरकते पट्टे) पादचारी पूल अंतिम टप्प्यात आला आहे. एमएमआरडीएच्या महालक्ष्मी मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीची होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत सुमारे २८३ मीटर लांब आणि ११ मीटर रुंद असा एकात्मिक पादचारी पूल उभारला जात आहे. पुलावर एकूण १७६ मीटर लांबीचे सहा ‘ट्रॅव्हलेटर्स’ बसवले जाणार आहेत. दिव्यांग प्रवाशांसह सर्वांसाठी दोन लिफ्टची सुविधाही उपलब्ध असेल. या पुलावरून दर तासाला साडेचार हजार प्रवासी ये-जा करू शकतील.प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मोनोरेल, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांदरम्यान बदलण्यासाठी लागणारा वेळ सुमारे २० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये अखंड जोडणी निर्माण झाल्याने खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
दाट नागरी वस्तीमध्ये हा प्रकल्प उभारताना मोठ्या व्यासाची पावसाच्या पाण्याची वाहिनी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आली. तसेच जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांना कोणताही अडथळा न आणता काम पूर्ण करण्यात आले. बांधकामादरम्यान एकही झाड तोडण्यात आले नसून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने साने गुरुजी मार्गावरील वाहतूक आणि गणेश विसर्जन मिरवणुकांवरही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.