शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल आरोग्यसुविधा : मुख्यमंत्री

महाराष्ट्र टाइम्स
शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल आरोग्यसुविधा : मुख्यमंत्री
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
गोरगरीब नागरिकांचे उपचार थांबू नयेत, यासाठी राज्य सरकार विविध योजनांतून आवश्यक निधी उपलब्ध करून देत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नव्याने गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्यसुविधा पोहोचाव्यात, या उद्देशाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात हे शिबिर झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, हर्षवर्धन देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. कर्करोगाच्या महागड्या औषधांबाबत बोलताना गडकरी यांनी बांग्लादेशमधून स्वस्त औषधे उपलब्ध करण्याचा मार्ग निघाल्यास गरजू रुग्णांना मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फिरता दवाखाना, रुग्णवाहिका लोकार्पण आणि दिव्यांगांना व्हील चेअर वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिक अजूनही आरोग्यसेवांपासून वंचित असल्याची खंत शिवप्रकाश यांनी व्यक्त केली.