माथाडींनी ५० किलोपेक्षा अधिक वजन उचलू नये

महाराष्ट्र टाइम्स

माथाडी कामगारांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी केली जाणार नाही. यासंदर्भात लवकरच एक स्वतंत्र परिपत्रक जारी केले जाईल. या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील.

50 kg weight limit for laborers new guidelines for ensuring health and safety

‘आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी’, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बुधवारी दिले.

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळण्याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपर्यंतच वजनाची हाताळणी करण्याबाबत परिपत्रक काढले जाणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तसेच इतर राज्यांमध्येही या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल’, असे ते म्हणाले.