जलवाहिनीची स्वच्छता सुरू

महाराष्ट्र टाइम्स

शहराला १२ जूनपासून २०० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनी युद्धपातळीवर तयारी करत आहेत. नक्षत्रवाडी ते जटवाडा या १७ किलोमीटरच्या जलवाहिनीची स्वच्छता सुरू झाली आहे. ही जलवाहिनी स्वच्छ झाल्यावर शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळेल. या कामामुळे नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होईल.

जलवाहिनीची स्वच्छता सुरू
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून १२ जूनपासून २०० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीतर्फे युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. नक्षत्रवाडी ते जटवाडा या १७ किलोमीटरच्या अंतरात टाकण्यात आलेल्या १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या स्वच्छतेचे काम बुधवारी (तीन जून) सुरू करण्यात आले आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान २५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी स्वच्छ करण्यात आली आहे. या जलवाहिनीतून जायकवाडी धरणाचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात घेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. प्रक्रिया केलेले पाणी नक्षत्रवाडीच्या डोंगरावर बांधण्यात आलेल्या दोन एमबीआरमध्ये (संतुलित जलकुंभ) चढवण्यात आलेआहे. डोंगरावरील सर्वात उंचावरच्या जलकुंभातून शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा करण्यासाठी एक हजार १००, एक हजार ५०० आणि दोन हजार मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२ जूनच्या सुमारास एक हजार ५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी ही जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आहे. ही जलवाहिनी नक्षत्रवाडी ते जटवाडा दरम्यान टाकण्यात आली आहे. हे अंतर १७ किलोमीटर आहे.

नक्षत्रवाडी एमबीआर, देवळाई चौक, राजेशनर, बंबाटनगर, जयभवानीनगर, सिडको - हडको, हर्सूल टी पॉइंट ते जटवाडा रोज अशी एक हजार ५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आहे. जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम दोन ते तीन दिवस चालणार आहे. या दरम्यान जलवाहिनीवरील अन्य तांत्रिक कामे पूर्ण केली जातील अशी माहिती सूत्रांनी दिली.