शहरात डिझेल आणि पेट्रोलच्या पुरवठ्यात गेल्या काही दिवसांपासून अडचणी सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या पुरवठ्यात होत असलेल्या अडचणीमुळे मंगळवारी शहरातील काही पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले. तर काही पंपांवर डिझेल स्टॉक नसल्याचे बोर्ड लावण्यात आले. कंपनीकडून पंपचालकांना इंधन पुरवठ्याच्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.
मंगळवारी शहरातील विविध भागांतील पंपांवर ‘नो स्टॉक’चा बोर्ड लागलेला होता. काही पंपांवर पेट्रोल उपलब्ध होते, तर डिझेलसाठी ‘नो स्टॉक’ असा बोर्ड लावलेला होता. ही परिस्थिती बुधवारीही सकाळच्या सत्रात काही पंपांवर दिसून आली. अजूनही शहरातील अनेक पंपांवर डिझेलसाठी पंप चालकांनाच प्रतीक्षेत राहावे लागत आहे. पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी गेलेल्या टँकरांना पानेवाडी डेपो परिसरातच उभे राहण्याची वेळ आलेली आहे. पानेवाडी ऑइल डेपो परिसरात तिन्ही कंपन्यांच्या डेपोत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.
गेल्या आठवड्यात सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे ऑइल डेपोतून पुरवठा बंद होता. सोमवारपासून पेट्रोल आणि डिझेल विक्री पुन्हा सुरू झाली. सुट्ट्यांच्या काळात इंधनाची मागणी वाढल्याने अनेक पंप चालकांचे पंप ड्राय झाले होते. यामुळे टँकर पानेवाडी डेपोत जाऊनसुद्धा या टँकरमध्ये डिझेल मिळत नाही. यामुळे शहरातील पंपांवरील इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. आगामी काही दिवसांत ही परिस्थिती चिघळण्याची शक्यता पंपचालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पानेवाडी डेपोत शहरातील काही पंप चालकांनी त्यांचे टँकर पाठविले. कंपनीच्या ऑनलाइन संकेतस्थळावर त्यांच्या मालासाठी अग्रिम रक्कम भरून ठेवली. हे टँकर पोहोचल्यानंतर, या टँकरला गेल्या आठवड्यात किंवा काही दिवसांपूर्वी इंधन खरेदी केलेले आहे, यामुळे तुम्हाला नंतर इंधन मिळेल, असे सांगण्यात येत आहे. यामुळे पंप चालकांना इंधन मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. इंधनासाठी एक ते दीड दिवसांपेक्षा अधिक काळ टँकर पानेवाडी डेपोत थांबण्याची वेळ पंप चालकांवर आली आहे. यामुळे पंप चालकांनी पेट्रोल खरेदी-विक्रीचा तसेच ज्या पंपावर मागणी जास्त आहे, अशा पंपांना इंधन पुरवठा करावा, अशी मागणी आहे. शहरातील विविध भागांत पंपांवर डिझेलचे ‘नो स्टॉक’ बोर्ड लागत आहेत. काही पंपांवर पेट्रोल आणि डिझेलही नाही. शहरात ही परिस्थिती कायम राहिल्यास लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरण्याचा धोका आहे.





