नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या ऐतिहासिक इमारतीची राज्य सरकारकडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी केली जाणार असून त्यानंतर सरकार कार्यालयांचे स्थलांतर करण्याची सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बुधवारी केली. इमारतीच्या मुख्य प्रवेशभागाचे महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे आकर्षक व सुशोभित स्वरूप विकसित करण्यासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद व तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही त्यांनी केली.
‘ एअर इंडिया ’ इमारतीचे सरकारकडे हस्तांतरण झाल्यानंतर भोसले यांनी आज इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.





