भुजबळ, हिंदुराव, आदिक इच्छुक

महाराष्ट्र टाइम्स

राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जूनला मतदान होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. छगन भुजबळ, प्रमोद हिंदुराव आणि अविनाश आदिक हे इच्छुक आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य या जागेसाठी मतदान करतील. निवडून येणाऱ्या सदस्याचा कार्यकाळ जवळपास दीड वर्षांचा असेल.

भुजबळ, हिंदुराव, आदिक इच्छुक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जूनला मतदान होणार आहे. त्याविषयीची माहिती निवडणूक आयोगाने बुधवारी घोषित केली. सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी तिसऱ्यांदा मतदान होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ , प्रमोद हिंदुराव , अविनाश आदिक इच्छुक असल्याचे कळते.

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून या एका जागेसाठी मतदान करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून असून, हे अर्ज विधान भवन, मुंबई येथे विहित मुदतीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी नऊ जून रोजी दुपारी १२ वाजता विधान भवन येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ११ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. या जागेसाठी निवडणूक लढविली गेल्यास १८ जूनला सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

राज्यसभेच्या या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे, एका जागेसाठी सहा वर्षांच्या काळात तिसऱ्यांदा मतदान होणार आहे. सर्वात आधी ही जागा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी लढवली होती. परंतु, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार पराभूत झाल्यानंतर त्यांच्यासाठी पटेल यांनी ही जागा सोडली. जानेवारी २०२६मध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी झाल्याने त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता निवडून येणाऱ्या सदस्याला जवळपास दीड वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

या जागेसाठी आपला विचार व्हावा, अशी जाहीर भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली होती. ही भूमिका मांडताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे उदाहरणही दिले आहे. तर, अविनाश आदिक हे पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांचे दीर्घकाळापासून विश्वासू असलेल्या प्रमोद हिंदुराव यांनीही या जागेसाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुनेत्रा आणि पार्थ पवार हे कुणाला संधी देणार याकडे लक्ष आहे.