येथील सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात ‘चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ’ आणि सार्वजनिक वाचनालय, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६ उत्साहात पार पडला.
मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र देवरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे कवी राजू देसले यांनी ग्रामीण भागातील साहित्य चळवळीचे कौतुक करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी मराठीच्या विविध बोलीभाषांतील शब्दसंपदा जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र मलोसे यांनी साहित्यिकांनी समाजाला दिशा देणारे लेखन करावे, असे प्रतिपादन केले. यावेळी ‘चांदवडी रुपय्या युवा पुरस्कार’ चंद्रपूरचे अविनाश पोइनकर आणि रत्नागिरीचे डॉ. अनिकेत मयेकर यांना प्रदान करण्यात आला. ‘काव्य पुरस्कार’ कवी चंद्रकांत बाबर (सांगली), ‘साहित्य प्रेरणा पुरस्कार’ कवी राजेंद्र दिघे (मालेगाव) तसेच लक्षवेधी पुरस्कार ‘मटा’चे प्रतिनिधी फणींद्र मंडलिक (नाशिक) यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी संदीप देशपांडे, जनार्दन देवरे, सागर जाधव, माया ठोके, संदीप गुजराथी, सविता दरेकर, ऋषिकेश दायमा, अक्षरा देवरे आणि दिगंबर देवढे यांनी मनोगत व्यक्त केले.





