शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. ३) सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत बेमुदत उपोषण सुरू केले. तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. नाफेडमार्फत प्रतिक्विंटल तीन हजार रुपये दराने कांदा खरेदी करावी, बागलाण तालुक्यातील १८ कांदा पीक कापणी प्रयोगांची नव्याने चौकशी करून शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळवून द्यावी. उपोषणात केशव सूर्यवंशी, भास्कर बागूल, श्रीपाद जाधव, सुनील बिरारी, विवेक सोनवणे, सुनील वाघ, देवीदास अहिरे, शेखर बागूल, यशवंत गुंजाळ, तुषार बागूल, प्रवीण जाधव, देवीलाल मांडवडे, आदी सहभागी झाले आहेत.





