गर्भलिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश

Contributed byपोलिस अधीक्षक|महाराष्ट्र टाइम्स

पुणे ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यवत परिसरातील एका तोतया डॉक्टरने अडीच वर्षांत हजाराहून अधिक महिलांचे गर्भलिंगनिदान केले. हे रॅकेट पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पसरले आहे. या प्रकरणी दोघांना अटक झाली असून, मोठ्या प्रमाणात गर्भपात झाल्याची शक्यता आहे. आरोपी प्रत्येक गर्भलिंगनिदानासाठी मोठी रक्कम घेत होते.

fetus gender determination racket exposed action against fake doctors

जिल्ह्यातील यवत परिसरातील एका तोतया डॉक्टरने गेल्या अडीच वर्षांत हजाराहून अधिक महिलांचे गर्भलिंगनिदान केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटची व्याप्ती पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतही पसरली असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गर्भपात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत यासंबंधीची माहिती दिली. यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत केडगाव परिसरात केलेल्या कारवाईत मुख्य संशयित आरोपी अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड) आणि डॉ. अतुल अंकुश जाधव (लोहगाव) यांना अटक करण्यात आली आहे. एजंट नरेंद्र ठाकरे, डॉ. मंदार माळी आणि डॉ. सुंदरम कदम यांच्याविरुद्ध गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाला गर्भलिंगनिदानाचा एक व्हिडीओ प्राप्त झाल्यानंतर डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात आरोपी गिरी हा विविध गावांमध्ये जाऊन महिलांची सोनोग्राफी करत असल्याचे उघड झाले. गिरी हा तोतया डॉक्टर असून, त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने फार्मसीचे शिक्षण अपूर्ण सोडले होते. यानंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करताना मिळालेल्या अनुभवाचा वापर करून त्याने हा बेकायदेशीर व्यवसाय उभारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान संशयित प्रत्येक गर्भलिंगनिदानासाठी ३० ते ५० हजार रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांकडून यापेक्षाही अधिक रक्कम वसूल केली जात होती. संशयित दरमहिन्याला गर्भलिंगनिदानासाठी सुमारे ४० सोनोग्राफी करीत होता. या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.