चित्रपट महामंडळ निवडणूक तयारीला वेग

महाराष्ट्र टाइम्स

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा प्रथमच नाशिकमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. रविवारी, ७ तारखेला मतदान होणार आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील १६० सभासद मतदानाचा हक्क बजावतील. तीन पॅनलमध्ये ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापूर्वी मतदारांना मुंबईला जावे लागत होते.

film federation election in nashik voting process begins

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मतदानासाठी यंदा प्रथमच नाशिकला केंद्र देण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ७) मतदान होणार असून, त्याबाबतची माहिती सभासदांना बैठकीत देण्यात आली.

महाकवी कालिदास कलामंदिरातील नाट्य परिषदेच्या सभागृहात ही बैठक झाली. त्यात सुनील ढगे व श्याम लोंढे यांनी मार्गदर्शन केले. महामंडळाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. बैठकीला चित्रपट, दूरदर्शन व नाट्य क्षेत्राशी संबंधित सभासद उपस्थित होते. समिती सदस्य रफिक सय्यद यांनी आभार मानले. रमेश तलवारे, राजेश जाधव, ललित निकम, सोनू निकम, सदाशिव जगताप, अरुण गिते, अमित गायकवाड, सतीश वाणी, सुनील नागमोती आदींसह कलावंत उपस्थित होते.

दरम्यान, चित्रपट महामंडळासाठी यंदा प्रथमच नाशिकमध्ये मतदान केंद्र देण्यात आले आहे. नाट्य परिषदेच्या सभागृहात रविवारी (दि. ७) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील एकूण १६० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे. तर विदर्भासह अन्य काही मतदार मिळून एकूण दोनशे मतदार आहेत. निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांचे ‘समर्थ’, सतीश रणदिवे, वर्षा उसगावकर यांचे ‘चित्रकर्मी’, तर सर्व अपक्षांचे मिळून ‘महामंडळ बचाव अपक्ष संघ’ असे तीन पॅनल समोरासमोर आहेत. निर्माता (२), दिग्दर्शक (२), लेखक, अभिनेता, अभिनेत्री, छायाचित्रण, नृत्य, ध्वनी, गायन, संकलन, कला दिग्दर्शक, वेशभूषा, निर्मिती व्यवस्था, प्रसिद्धी व कामगार अशा एकूण सतरा जणांच्या प्रतिनिधी मंडळापैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे चौदा जागांवर निवडणूक होत असून, तिन्ही पॅनल मिळून ४० उमेदवार रिंगणात आहेत.

नाशिकच्या मतदान केंद्रात नाशिक शहर व जिल्ह्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गुजरातचे मतदारही मतदान करू शकणार आहेत. यापूर्वी या मतदारांना मतदानासाठी थेट मुंबई गाठावी लागत होती.