भारतातील सेकंड हँड कारविक्रीच्या बाजारपेठेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सेकंड हँड कारना असलेली वाढती मागणी पाहता २०३०-३१च्या आर्थिक वर्षांपर्यंत ही बाजारपेठ ७० अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंटने ताज्या अहवालात व्यक्त केला आहे.
भारतात सद्यस्थितीत दरवर्षी अंदाजे साठ लाख सेकंड हँड कार ची विक्री होते. पुढील पाच वर्षांत हा आकडा ९० लाख ते एक कोटीवर पोहोचेल, असा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. नवी कार विकत घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने सेकंड हँड कार घेण्याकडे अनेकांचा कल होता. मात्र आता ही मानसिकता बदलत आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
यामध्ये एसयूव्ही कारना अधिक मागणी असल्याचे दिसत आहे. मोठ्या आकाराची कार, अधिक वैशिष्ट्ये, विविध स्वयंचलित यंत्रणा, आकर्षक अंतरंग, सनरुफ आदी वैशिष्ट्यांची खरेदीदारांना भुरळ आहे. ही सारी वैशिष्ट्ये सेकंड हँड कारच्या माध्यमातून मिळवण्यास कारप्रेमींची पसंती आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.





