शहरात म्हाडा घोटाळा चर्चेत असताना आता नामांकित बिल्डरसह भागीदारांनी मखमलाबाद शिवारातील भूखंडाची परस्पर विक्री करून घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात ५३ वर्षीय व्यक्तीच्या फिर्यादीवरून संशयित जितेंद्र ठक्कर यांसह अकरा जणांवर फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एमपीडीआयडी) अंतर्गत सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
जेलरोड येथील रहिवाशी हेमंत सुरेश सातभाई (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित जितेंद्र मनोहरदास ठक्कर, काश्मिरा राजेंद्र शहा, अनघा यशवंत गुजर, बाबूलाल मणिलाल शहा, राजेश बाबुलाल शहा, रोहित मणिलाल शहा, सुरेंद्र मणिलाल शहा, अश्विन गोवर्धनदास जसपरा, राजेंद्र रसिकलाल शहा आणि संस्थेचे पदाधिकारी शरद कुटे व भास्कर आनंदराव पवार यांच्यावर गुन्हा नोंद आहे. सातभाई हे सन १९९८ मध्ये वकिली व्यवसायात असताना त्यांनी ‘वकील नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’चे सदस्यत्व घेतले होते. मखमलाबाद शिवारातील भूखंड खरेदीसाठी त्यांनी संस्थेकडे ६१ हजार रुपये जमा केले होते. त्यानुसार सुरुवातीला त्यांना २८६ चौरस वारचा भूखंड क्रमांक २०८ देण्यात आला. त्याबाबतचे खरेदीखत ३१ डिसेंबर २००१ रोजी झाले होते. उर्वरित ३६ हजार ४०० रुपये संस्थेकडे जमा असल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भूखंड १२५ (३६० चौरस वार) देण्याबाबतचे ‘लेटर ऑफ अलॉटमेंट’ ५ एप्रिल २०११ व १ एप्रिल २०१७ रोजी सातभाईंना दिले होते. सातभाई यांनी भूखंड क्रमांक १२५ याचा मोबदला दिला असूनही बिल्डर व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने रितसर खरेदी खत नोंदवून दिले नाही. संशयितांनी आर्थिक फायद्यासाठी फौजदारीपात्र कट कारस्थान रचले. २४ डिसेंबर २०२० रोजी बनावट खरेदीखत तयार करून सदर भूखंड फिर्यादींच्या संमतीविना परस्पर देवरे यांना विकला. १ जून २०२६ रोजी फिर्यादींनी सोसायटीचे सचिव शरद कुटे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर सातभाई यांनी २ जून २०२६ रोजी सरकार वाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संशयितांनी अशाच प्रकारे इतरही काही सभासदांची फसवणूक केल्याचा संशय फिर्यादींनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या प्रकरणात सरकारवाडा पोलिस व गुन्हे शाखा एकत्रित तपास करीत असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.





