सिन्नरला बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सिन्नरमध्ये बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. मालेगावात मुख्याध्यापकाचा मृतदेह विहिरीत सापडला. येवला येथे बोगस दवाखाना सील करण्यात आला. सिन्नरच्या अमरधाम परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. मनमाड-नांदगाव मार्गावर अपघातात एक जण ठार झाला. चापडगाव येथे ट्रॅक्टर उलटून युवकाचा मृत्यू झाला.

सिन्नरला बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

सिन्नर : शहरातील द्वारकानगर परिसरात फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर सिन्नर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. यात दारूनिर्मितीसाठी लागणारे साहित्य, रसायने, बनावट लेबले, रिकाम्या बाटल्या आणि तब्बल ११ लाख रुपयांची रोकड असा एकूण १४ लाख ३७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राहुल उर्फ सागर बबन आव्हाड (वय ३३, रा. साईआनंद अपार्टमेंट, द्वारकानगर, उद्योग भवन, सिन्नर) याला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार दिनेश गायकवाड (रा. धुळे) हा पसार झाला. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्याध्यापकाची विहिरीत आत्महत्या

सिन्नरला बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

सिन्नरला बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

मालेगाव : येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले वाके येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत अहिरे यांचा मृतदेह मुंबई-आग्रा महामार्गावरील पाटणे शिवारातील एका विहिरीत आढळून आला. शिवापंजाब हॉटेलसमोरील एका शेतातील विहिरीलगत एक दुचाकी बेवारस स्थितीत उभी होती. हॉटेल व्यावसायिकास संशय आल्याने त्याने तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीच्या क्रमांकावरून तपास केला असता, दुचाकी गिलाणे येथील अहिरे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. दुचाकी मालक शशिकांत अहिरे हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. सोयगाव नववसाहत भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबाकडून त्यांचा शोध सुरू होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत शोध घेत अहिरे यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.

बोकटे येथील बोगस दवाखाना सील

येवला : तालुक्यातील बोकटे येथे आरोग्य विभागाने कारवाई करून बोगस दवाखाना सील करण्यात आला. बोकटे येथे डॉ. रॉय यांच्याकडून गुडघेदुखीसह विविध आजारांवर हमखास उपचार होत असल्याचा दावा केला जात होता. तसेच विनापरवाना उपचार केले जात असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत आरोग्य अधिकारी डॉ. तारू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मंगळवारी, (दि. २) दुपारी संबंधित ठिकाणी छापा टाकून गोळ्या, औषधे, इंजेक्शन तसेच उपचारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी व पडताळणी केली जात असून, चौकशीअंती दोषीवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सिन्नरच्या अमरधाम परिसरात बिबट्याची दहशत

सिन्नर : शहरातील संगमनेर नाका येथील अमरधाम परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वारंवार बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे पोहोचल्यानंतर अखेर परिसरात पिंजरा बसविण्यात आला. वनपाल तानाजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

मनमाड-नांदगाव मार्गावर अपघातात एक ठार

मनमाड : मनमाड नांदगाव मार्गावर नागापूर शिवारात मोटारसायकल व बोलेरो वाहनाच्या अपघातात एक ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. एमएच १५, एमएम १६०२ या क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील आकाश निंबाळकर याचा मृत्यू झाला, तर गणेश हारदे जखमी झाला. त्यास मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

चापडगाव येथे ट्रॅक्टर उलटून युवकाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील चापडगाव स्मशानभूमीजवळील चोंडी नाल्यात ट्रॅक्टर उलटून रोहित भिकाजी आव्हाड (वय २५, रा. चापडगाव) या युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी चापडगावचे पोलिस पाटील अंकुश अागिवले हे चोंडी बंधाऱ्याकडे जात असताना चोंडी नाल्यात ट्रॅक्टर उलटलेला दिसून आला. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ट्रॅक्टरखाली दबून चालक रोहित आव्हाड याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.