आत्मसमर्पित माओवाद्यांनी बांधली लग्नगाठ

महाराष्ट्र टाइम्स

गोंदियात आत्मसमर्पित माओवादी पांडू पुसू वड्डे आणि सैवंती रायसिंग पंधरे विवाहबंधनात अडकले. गोंदिया पोलिस मुख्यालयात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. हिंसाचार आणि अनिश्चिततेचे जीवन सोडून त्यांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. आता त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

आत्मसमर्पित माओवाद्यांनी बांधली लग्नगाठ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

आत्मसमर्पण केलेल्या माओवादी पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. गोंदिया पोलिस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. विवाह बंधनात अडकून गोलू आणि संगीता यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

अलीकडेच गोंदिया जिल्ह्यात १५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांना पोलिस मुख्यालय कारंजा येथील पोलिस वसाहतीत ठेवण्यात आलेले आहे. पांडू पुसू वड्डे (वय ३७), रा. तिरलागड, ता. पखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) हा माओवादी संघटनेत गोलू या नावाने ओळखला जात होता. तो सीपीआय (माओवादी) संघटनेत दर्रेकसा एरियामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होता. तर सैवंती रायसिंग पंधरे (वय ३६), रा. राशीमेटा, ता. बैहर, जि. बालाघाट (मध्य प्रदेश) ही माओवादी संघटनेत संगीता या नावाने ओळखली जात होती. ती दरेकसा एरिया कमिटीमध्ये एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती. अनेक वर्षे हिंसाचार, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जीवन व्यतीत केल्यानंतर या दोघांनीही २८ नोव्हेंबर २०२५ रोजी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मुख्य प्रवाहात परतल्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.