तेजी ठरली अल्पजीवी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शेअर बाजारात पुन्हा अनिश्चितता पसरली. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी आलेली तेजी बुधवारी टिकली नाही. सेन्सेक्स ३०३ अंकांनी घसरून ७४३४६ वर बंद झाला. निफ्टी ७७ अंकांनी घसरून २३४०५ वर पोहोचला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी गुंतवणूकदारांनी काढलेली गुंतवणूक यामुळे बाजारात घसरण झाली. टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस यांसारख्या कंपन्यांच्या शेअर दरात घट झाली.

तेजी ठरली अल्पजीवी

मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांतील व्यवहारांत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली अनिश्चितता बुधवारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सलग चार सत्रांतील पडझडीनंतर मंगळवारी सावरलेले निर्देशांक बुधवारीही तेजी कायम राखतील अशी आशा असताना बुधवारी निर्देशांकांनी पुन्हा गटांगळ्या खाल्ल्या. मंगळवारची तेजी अल्पजीवीच ठरल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३०३ अंकांच्या घसरणीसह दिवसअखेरीस ७४३४६वर बंद झाला. तर, ७७ अंकांच्या घसरणीसह निफ्टी ने २३४०५चा स्तर गाठला. सेन्सेक्स व निफ्टी काही दिवसांपासून कमालीचे चढउतार अनुभवत आहेत. मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे अंकांची वृद्धी साधली होती. सलग चार दिवसांची पडझड खंडित झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु बुधवारी बाजार उघडतात दोन्ही निर्देशांक कोसळले. सत्रांतर्गत व्यवहारात सेन्सेक्सने एका क्षणी ११५७ अंकांची चिंताजनक आपटी अनुभवली. मात्र, ही घसरण मोठ्या प्रमाणात कमी करण्यात दोन्ही निर्देशांकांना दिवसअखेरीस यश आले.

कच्च्या इंधनाच्या

दरवाढीची चिंता

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात लक्षणीय वाढ झाली. अमेरिका-इराणदरम्यान सुरू असलेल्या युद्धातून काहीच सकारात्मक बातमी येत नसल्याचा आंतरराष्ट्रीय इंधन बाजारावर मोठा दबाव आहे. ब्रेण्ट क्रूड ऑइलचे प्रतिबॅरल दर तीन टक्क्यांनी वाढून ९८.९२ डॉलरवर पोहोचल्याने आघाडीच्या शेअर बाजारांनी धसका घेतला. हे नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतही निर्देशांकांच्या घसरणीसाठी कारणीभूत ठरले.

विदेशी गुंतवणूकदारांची भारताकडे पाठ

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारांतून गुंतवणूक माघारी नेण्याचे सत्र कायम ठेवले आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या व्यवहारात ८,३६२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली, अशी माहिती बुधवारी देण्यात आली. विदेशी गुंतवणूकदारांचा हा पवित्राही दोन्ही निर्देशांकांसाठी मारक ठरला.

सोमवार व मंगळवारच्या सत्रात एकूण ९ टक्क्यांनी वधारलेल्या टीसीएसच्या समभागाचे मूल्य बुधवारी ८.४३ टक्क्यांनी गडगडले. तर, टेक महिंद्रा (६.२३), एचसीएल टेक (५.२५), इन्फोसिस (३.८२) याप्रमाणे समभागमूल्य घटले. याशिवाय, आयटीसी, इटर्नल, एल अँड टी, बजाज फायनान्स आदी कंपन्यांच्या समभागांचे मूल्यही कमी झाले. दुसरीकडे, इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, ट्रेंट या समभागांनी तेजी अनुभवली.