कांदा खरेदीचे निकष ‘नाफेड’कडून शिथिल

Contributed byनिफाड|महाराष्ट्र टाइम्स

नाफेडने कांदा खरेदीचे नियम सोपे केले आहेत. अवकाळी पावसामुळे खराब झालेल्या कांद्यालाही आता खरेदीत स्थान मिळणार आहे. पूर्वीच्या तुलनेत लहान आकाराचा कांदाही स्वीकारला जाईल. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाफेड खरेदी केंद्रांवर कांद्याची आवक वाढण्याची अपेक्षा आहे. हा निर्णय शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

कांदा खरेदीचे निकष ‘नाफेड’कडून शिथिल
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत नाफेडने कांदा खरेदीचे निकष काहीसे शिथिल केले आहेत. यंदा अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि कडक उन्हामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने अपेक्षित दर्जाचा कांदा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी नाफेडच्या खरेदी प्रक्रियेपासून वंचित राहत होते.

नाफेडकडून कांदा खरेदीची घोषणा केल्यानंतर हा कांदा खरेदी करताना अनेक जाचक अटी असल्याने या खरेदीचा लाभ शेतकऱ्यांना होईल यात साशंकता होती. कारण अटीनुसार कांदाविक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शक्य नसल्याने याबाबत प्रतिसादच अल्पच होता. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत नाफेडने खरेदीसाठी पात्र कांद्याच्या गुणवत्तेबाबतचे नियम सैल केले आहेत. नव्या निकषांनुसार पूर्वी ५५ मिमी आकाराचा कांदा ग्राह्य धरला जात होता, मात्र आता ४५ मिमी आकाराचा कांदाही खरेदी केला जाणार आहे. तसेच एक आवरण निघालेला, ३० टक्क्यांपर्यंत काजळी असलेला, ४० टक्क्यांपर्यंत डाग किंवा रंगबदल झालेला आणि १० टक्क्यांपर्यंत उन्हाचा चटका लागलेला कांदाही स्वीकारला जाणार आहे. या निर्णयामुळे प्रतिकूल हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, नाफेड खरेदी केंद्रांवरील कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.