आपल्या खात्याचा गैरवापर होऊ देऊ नका

Contributed byसायली भोईर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आपल्या बँक खात्याचा गैरवापर टाळा. सायबर गुन्हेगार 'मनी म्यूल' खात्यांचा वापर करून फसवणूक करत आहेत. बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या खात्यात बेकायदेशीर पैसे जमा केले जातात. असे झाल्यास खातेदारही गुन्हेगार ठरू शकतो. बँक खात्यातील व्यवहार नियमित तपासा आणि संशयास्पद व्यवहार तात्काळ बँकेला कळवा. यामुळे तुम्ही मोठ्या कायदेशीर अडचणीतून वाचू शकता.

आपल्या खात्याचा गैरवापर होऊ देऊ नका

डिजिटल फ्रॉड, सायबर क्राइमसोबतच `मनी म्यूल' संकल्पना हल्ली अधिक प्रचलित झालेली आहे. मनी म्युल खाती या शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर, म्युल म्हणजे खेचर – जे दुसऱ्याची ओझी वाहते आणि मनी म्हणजे पैसा. मनी म्यूल खात्यात गुन्हेगार अनाधिकृतपणे इतरांच्या खात्यांचा वापर करत बेकायदा मार्गाने मिळविलेले पैसे त्यात जमा करतात. त्यामुळे असे इतर खातेदारही गुन्ह्यामध्ये नकळतपणे सामील होत असतात.

तसे पाहिले तर मनी म्यूल्सचे प्रकार कित्येक वर्षापासून सर्व देशांमध्ये घडत आहेत. मनी म्यूल्स हे मध्यस्थाचे काम करतात. पूर्वी ते बंदी आणलेल्या वस्तू विदेशातून आणून त्याची तस्करी करत असत. आता ते सर्वसामान्य खातेदाराच्या स्वरूपात आहेत.

सायबर गुन्हेगार अनेकदा समाजातील बेरोजगारांना अथवा आर्थिक अडचणीत असलेल्या महिला किंवा युवावर्गास, प्रामुख्याने विद्यार्थ्यांना अर्धवेळ कामाचे, किंवा भरपूर कमिशन किंवा लॉटरीचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्याचा वापर करतात. अशा खात्यात अन्य लोकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळालेले पैसे वळते करतात.

एखाद्या खातेदाराला आपल्या खात्यात अनधिकृतपणे रक्कम जमा झाली आहे, असे लक्षात आल्यास त्याने तत्काळ ही बाब बँक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून द्यावी. अन्यथा संबंधित खातेदारास मनी लॉड्रिंगच्या अथवा फसवणुकीच्या गुन्ह्यांतर्गत पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. खातेदाराचे खाते मनी म्यूल म्हणून वापरल्यास सायबर सेलच्या सूचनेनुसार बँक अधिकारी असे खाते तात्पुरते किंवा कायमचे ब्लॉक करू शकतात.

मनी म्यूल खाती ही नेहमीच फेक अथवा बेनामी असतात असे नाही. कधीकधी अशी खाती ही सर्वसामान्य नागरिकांनी आपली खरी ओळखपत्रे बँकेत केवायसीकरिता सादर करून उघडलेली असतात. सायबर गुन्हेगार काही गरजू खातेदारांना लक्ष्य करून कधी त्यांच्या परवानगीने तर कधी त्यांच्यावर दबावतंत्र अवलंबून किंवा कधी त्यांना पैशाची आमिषे दाखवून त्यांच्या खात्याचा वापर करतात आणि सायबर गुन्ह्यातील रक्कम वर्ग करण्यासाठी ती वापरतात. गुन्हेगार मग त्या खातेदाराला ती रक्कम अन्य खात्यात वळती करावयास सांगतात. तेथून ती दुसऱ्या खात्यात वळती होते. अखेरीस ती गुन्हेगाराच्या खात्यात जमा होते. अशा प्रकारे सायबर गुन्ह्याची एक साखळी तयार होते व या गुन्ह्यात फसला गेलेला अथवा जाणूनबुजून सामील झालेला प्रत्येक खातेदार या साखळीचा एक हिस्सा ठरतो.

वास्तविक आपण काही गुन्हा करीत आहोत याची खातेदाराला जाणीवही नसते. तो आपल्या खात्याचा वापर गुन्हेगाराला करावयास देऊन, त्याच्या गुन्ह्याचे ओझे, वाहत असतो म्हणून अशा खातेदाराला मनी म्यूल म्हणतात. अशा व्यवहारात एकाचवेळी मोठी रक्कम जमा होत असते किंवा लहान रक्कमा मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या असतात व त्याच दिवशी या रकमा अन्य बँकात हस्तांतरित होत असतात. परिणामी, अशी मनी म्यूल्स खाती ब्लॉक केली जातात. खातेदारांवर मग मनी लॉड्रिंगचा आरोप ठेवला जातो. प्रसंगी त्यांना तुरुंगवास होऊ शकतो.

खातेदाराच्या क्रेडिट रेटिंगवरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे खातेदारांनी कोणत्याही बनावट वेबसाइटला, फसव्या ई-मेलला अथवा आकर्षक जाहिरातींना, कमिशनच्या प्रलोभनांना बळी पडू नये. कधीकधी डेटिंग वेबसाइटवर पलीकडील आभासी व्यक्ती ग्राहकाला मोठ्या रकमांचे आमिष दाखवून खाते उघडायला लावतात व त्यात बेकायदा रक्कम हस्तांतरित करतात. त्यामुळे खातेदारांनी आपल्या खात्यातील व्यवहार नियमितपणे तपासले पाहिजेत. खात्यातील व्यवहारांना एका ठरावीक रकमेपर्यंत मर्यादित केले पाहिजे. (क्रमश:)