‘सोन्याचा साठा आजही तेवढाच’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रिझर्व्ह बँकेने रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी सोनेविक्री केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. बँकेने स्पष्ट केले की सोन्याचा ८८०.५२ टनांचा साठा कायम आहे. परकीय चलन गंगाजळीत सोन्याचे प्रमाण वाढले असून, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पश्चिम आशियातील युद्धसंकटामुळे सोनेविक्री झाल्याच्या बातम्या निराधार ठरल्या आहेत.

reserve banks gold reserve stable rumors false

मुंबई : रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी सोनेविक्री केल्याचा दावा रिझर्व्ह बँकेने बुधवारी फेटाळून लावला. सोन्याचा ८८०.५२ टनांचा साठा कायम आहे, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

पश्चिम आशियातील युद्धसंकटामुळे विदेशी गंगाजळीच्या संरक्षणासाठी रिझर्व्ह बँकेने १२ अब्ज डॉलर मूल्याइतके सोन्याची विक्री केली असावी, असे वृत्त काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर बँकेने याबाबत स्पष्टीकरण दिले. ‘हे वृत्त निराधार आहे. भारताच्या परकीय चलन गंगाजळीत सोन्याचे प्रमाण सप्टेंबर २०२५च्या १३.९२ टक्क्यांवरून ३१ मार्च २०२६ रोजी १६.७० टक्क्यांपर्यंत वाढले. त्यानंतर २२ मे २०२६ रोजी त्याचे प्रमाण १६.८५ टक्क्यांपर्यंत वाढले’, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. पत्रसूचना विभागानेही (पीआयबी) याबाबत एक तथ्य तपासणी अहवाल प्रसिद्ध करून या चर्चांना पूर्णविराम दिला.