राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय (सामान्य) या प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा आज, गुरुवारी रेशीमबाग येथील मैदानावर सायंकाळी ६.३० वाजता होईल. या सोहळ्याला उद्योगपती, पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मुख्य मार्गदर्शन व उद्बोधन याप्रसंगी होईल.
समारोप सोहळ्याला देशभरातून अनेक नामवंत आणि निमंत्रित अतिथी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री भारतभूषण त्यागी, योगी भवनाथ महाराज, महाराजा गजसिंह, गोपालभाई मावजी गोरसिया, दिव्यम त्रिपाठी, गोविंद मावजी गोरसिया, भार्गव सुथार यांचा समावेश आहे. ११ मेपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गात देशभरातील विविध प्रांतांतून एकूण ८८० शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. या २५ दिवसांच्या कालावधीत शिक्षार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक आणि संघटनात्मक स्तरावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या वर्गात सहभागी झालेल्या शिक्षार्थ्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. यामध्ये पदवीधर-४१३, पदव्युत्तर-३३२, दहावी आणि बारावी उत्ताीर्ण-६३, दहावीपर्यंत शिक्षित-३१, इतर-४१ आहेत. याशिवाय व्यावसायिक पार्श्वभूमी पाहता यामध्ये व्यावसायिक वा उद्योजक-५८३, पूर्णवेळ प्रचारक-२३५, विद्यार्थी-६२ आहेत.





