जिल्ह्यात बुधवारी (दि. ३) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी ४.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक तालुक्यात २१.१ मिमी पाऊस नोंदविला गेला. चांदवड तालुक्यात वीज पडून चार गायींचा मृत्यू झाला, तर पेठ आणि सुरगाण्यात घरांचे पत्रे उडाले. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असा इशारा दिला आहे.
मंगळवारी (दि. २) दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने शहरासह आसपासच्या गावांमध्ये दमदार हजेरी लावली. नाशिक तालुक्यात २१.१ मिमी पाऊस नोंदविला गेला. दिंडोरीत १८, सिन्नरमध्ये ८.९ मिमी, इगतपुरीत ८.४, त्र्यंबकेश्वरमध्ये ७.३ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. येवला आणि चांदवडमध्ये पावसाचा हलका शिडकावा झाला. तालुक्यातील बहादुरी येथील संजय पवार या शेतकऱ्याच्या दोन गाभण गायींचा वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय कोकणखेडे येथील समाधान सोनवणे, नवापूर येथील अशोक महाले यांच्या गायीचाही वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
पारेगाव येथील शेतकरी अशोक एकनाथ महाले यांच्या बैलाचा वीज कोसळून मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील डोंगराळे येथील कांतीलाल चुडामन पिठे यांच्या घराची पडझड झाली. पेठ तालुक्यातील सादडपाडा येथील गणेश भुसारे आणि अंबापूर येथील किरण पालवी यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले. जिल्ह्यात बुधवारी किमान तापमान २०.६ अंश, तर कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सियस नोंदविले गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास शहरात पावसाचा हलकासा शिडकावा झाला.





